Ashok Kharat Case: भोंदूगिरी आणि महिला अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता मोहीम सुरू केली आहे. कोपरगाव शहरात व्हॉट्सॲप ग्रुपवर हे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे सोशल मीडिया युजर्स आणि ग्रुप ॲडमिन्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी कारवाई काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 25 मार्च 2026 रोजी कोपरगावमधील ‘BMW’ नावाच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे याने पीडित महिलांची ओळख पटेल असे आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केले होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कोपरगाव पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. तपासात धक्कादायक साखळी समोर आली. राहुलला हे व्हिडिओ योगेश या तरुणाने पाठवले होते, त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. तथापी, योगेशला हे व्हिडिओ बीडमधील संदीपने पाठवले होते. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कायदेशीर बडगा
या तिन्ही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 294 (2), 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम 67 (A) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाशिकच्या विशेष तपास पथकाद्वारे (SIT) खरात प्रकरणाचा तपास सुरू असताना, अशा प्रकारे पीडितांची ओळख उघड करणे हा गंभीर गुन्हा मानला जात आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यामध्ये अनेक महिलांची प्रतिमा मलिन होण्याचा धोका आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना कडक इशारा दिला आहे की, कोणत्याही पीडित महिलेची ओळख पटेल असे व्हिडिओ किंवा फोटो कोणाकडेही असल्यास ते तात्काळ डिलीट करावेत. असे व्हिडिओ कोणत्याही ग्रुपवर किंवा वैयक्तिक चॅटमध्ये फॉरवर्ड करू नका. अफवा पसरवणे किंवा अश्लील मजकूर प्रसारित करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो.


