पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) चे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांनी आज (दि. १२) सकाळी हवेली तालुक्यात पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. याची सुरुवात मौजे श्रीक्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथील, थेऊर ते काकडे मळा रस्त्याची पाहणी करून केली. या रस्त्यालगत उच्चदाब व अतिउच्चदाब वाहक विद्युत वाहिनीचे पोल असल्याने, सदर वाहिन्यांचे पोल स्थलांतरित केल्याशिवाय, काम सुरूहोऊ शकत नाही, असे यावेळी स्थानिक नागरिकांनी सांगितले. पुढील दिवसांत युद्धपातळीवर इलेक्ट्रिक पोल स्थलांतरित करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. कामात दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
यावेळी थेऊर गणपतीचे दर्शन घेत येथील वाहनतळाच्या सध्यस्थितीची पाहणी करून, नवीन वाहनतळ निर्माण करण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचित केले. यावेळी मुळा-मुठा नदीकाठच्या सती रमाबाई स्थळाची पाहणी करून हे समाधीस्थळ सुधारण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सुचनाही दिल्या.
त्यानंतर प्रयागधाम येथे सुरू असलेल्या रस्त्याची पाहणी करून, तेथील अडचणी समजून घेत गतीने काम करण्याच्या सुचना दिल्या. हिंगणगाव येथे पीएमआरडीएकडून मंजूर झालेल्या नदीवरील पुलाच्या जागेची पाहणी केली. उरुळीकांचन येथे पुणे- सोलापूर महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची, पोलीस निरीक्षक शंकर चव्हाण यांच्याकडून माहिती घेऊन, रस्त्यालगतच्या निर्गमित केलेल्या अतिक्रमणांची पाहणी आयुक्तांनी केली. तसेच येथील पांढरस्थळ येथे सुरू असलेल्या रस्त्याची स्सद्यथिती जाणून घेऊन, दौंड तालुक्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी, डाळिंब देवस्थानकडे रवाना झाले.
यावेळी आयुक्त योगेश म्हसे यांच्या समवेत मुख्य अभियंता अशोक भालकर, अधीक्षक अभियंता प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता शितल देशपांडे, उपअभियंता सुभाष मोरे, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर आतकरे, विद्युत उपअभियंता मनोज जगताप, कनिष्ठ अभियंता प्रशांत सावंत, कोरेगावमुळचे विठ्ठल शितोळे, प्रयागधाम ग्रामपंचायतचे पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित होते.


