मुंबई : बॉलिवूड रॅपर बादशाहला गेल्या काही काळात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला त्याने ‘टटीरी’ हे गाणे लाँच केले. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. गाण्याचे बोल आक्षेपार्ह होते. यामुळे हरियाणामध्ये बादशाहवर कारवाई करण्यात आली.
बादशाहने त्याची मैत्रीण ईशा रिखी हिच्यासोबत गुपचूप लग्न केले होते, ज्याचे फोटो त्याच्या सासूने शेअर केले होते. हे फोटो समोर येताच, रॅपरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले. बादशाह एका मुलीचा बाप आहे आणि त्याच्या या गुप्त लग्नाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता या सर्व प्रकरणानंतर बादशाहने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक मोठी पोस्ट टाकली आहे. बादशाहने लिहिले की, गेल्या काही आठवड्यांनी त्याची अशा प्रकारे परीक्षा घेतली आहे, ज्याची त्याने अपेक्षा केली नव्हती किंवा ज्यासाठी तो तयारही नव्हता.
रॅपर म्हणाला, “बाहेरून पाहता आयुष्य खूप परिपूर्ण वाटते. पण जेव्हा कॅमेरे बंद होतात, तेव्हा तुम्ही एकटेच जे ओझे वाहता ते खरोखरच वेगळे असते. आजकाल मी माझ्या मनात खूप काही साठवून ठेवले आहे.”, असे म्हणत त्याने त्याच्या खाजगी जीवनातील महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले.


