Pune News : पुण्यातील लोहगाव परिसरात हुंड्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुळशीतील राजकीय आणि सहकार क्षेत्राशी संबंधित व्यक्ती अनिल लोखंडे आणि त्यांची पत्नी सुवर्णा लोखंडे यांच्याविरोधात लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या लग्नासाठी माहेरच्यांनी तब्बल दोन कोटी रुपयांपर्यंत खर्च केला होता. यामध्ये दोन किलो चांदी आणि एक आलिशान कारही देण्यात आली होती. मात्र, इतके सर्व देऊनही सासरच्यांची मागणी संपली नाही. शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी सूनेकडून माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकला.
या पैशांसाठी सूनेला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागल्याचा आरोप आहे. तिच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावणे, तसेच अंगावर गरम पाणी टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी अटकेपासून बचावासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा चर्चेत आला असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


