Pune News : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भोंदूबाबाच्या फसवणुकीला कंटाळलेल्या नागरिकांनी थेट संताप व्यक्त करत संबंधित बाबाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पाईट-सावंतवाडी परिसरात एका महिलेची पाच हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या भोंदूबाबावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुवाबाजीच्या नावाखाली महिलेकडून पैसे उकळल्यानंतर हा प्रकार उघड झाला. यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी संबंधित बाबाला पकडून चोप दिला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात भोंदूबाबांविरोधात संतापाची लाट उसळलेली दिसत आहे. ग्रामीण भागातही लोक अधिक सतर्क झाले असून अशा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरोधात थेट कारवाई करण्याचा पवित्रा घेतला जात आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक तथाकथित बाबांनी आपले अड्डे बंद केले असून नागरिक आता अशा प्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.


