Beed Crime : बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात प्रेमसंबंधांमधून निर्माण झालेल्या वादाचा दुर्दैवी शेवट झाला आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणी आणि मानसिक छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे असून, त्याचे नेकनूर परिसरातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतले. त्यानंतर त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेत चार जणांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.
याचबरोबर त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करून गावात बदनाम करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे. या सर्व प्रकारामुळे ज्ञानेश्वर मानसिक तणावाखाली गेला होता.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने, “मला खूप मारले, चोरटा म्हणून बदनाम केले आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या,” असा उल्लेख केला आहे. त्यानंतर त्याने धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका दुकानात गळफास घेऊन आयुष्य संपवले.
दरम्यान, मृताच्या आईनेही गंभीर आरोप करत मुलाला झाडाला बांधून मारहाण केल्याचे सांगितले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


