Sayali Jadhav Murder: देवदर्शनाचे खोटे निमित्त करून पत्नीला परराज्यात नेणे आणि तिथे तिचा क्रूरपणे खून करणे, अशा बारामतीमधील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सायली जाधव या विवाहितेची तिचा पती अक्षय जाधव याने कर्नाटकच्या कलबुर्गी येथे हत्या केली. चारित्र्याचा संशय आणि पैशांच्या हव्यासापोटी हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, आरोपी पतीला कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी सायलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
देवदर्शनाचा बनाव आणि काळजाचा थरकाप उडवणारी हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी अक्षयने सायलीला गाणगापूर येथे दर्शनासाठी नेले होते. प्रवासादरम्यान कलबुर्गी परिसरात त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या अक्षयने सायलीला गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केली. क्रूरतेची सीमा ओलांडत त्याने धारदार शस्त्राने सायलीचा गळा चिरला. केवळ एवढेच करून तो थांबला नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि मृत्यूची खात्री करण्यासाठी त्याने सायलीच्या मृतदेहावरून कार चालवून तिला चिरडले. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
छळाची भीषण कहाणी: माहेरच्यांचा आक्रोश
सायलीच्या कुटुंबीयांनी अक्षयच्या क्रूरतेचा पाढाच वाचला आहे. “घर बांधण्यासाठी आणि नवीन गाडी घेण्यासाठी अक्षय सायलीकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत होता. पैशांसाठी तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असे,” असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
“आम्हाला तिचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही”
सायलीची आत्या रोहिणी यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत सांगितले की, अक्षयने अवघ्या काही दिवसांतच सायलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्याने फसवून तिची हत्या केली. आम्हाला तिची बॉडीदेखील नीट घरी आणता आली नाही. तिला शेवटचा स्पर्शही करता आला नाही, इतके आम्ही कमनशिबी ठरलो. सायलीला वारंवार बदनामीची भीती दाखवून तिचा छळ केला जात असल्याचेही नातेवाईकांनी सांगितले.


