Nanded Crime News : नांदेड शहरात मध्यरात्री घडलेल्या भीषण गँगवारने खळबळ उडवली आहे. कॅनाल रोड परिसरातील डी-मार्टजवळ झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, ही घटना रात्री साधारण १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. काही तरुणांमध्ये अचानक वाद झाला आणि त्याचे रूपांतर क्षणात हिंसक हाणामारीत झाले. या राड्यात धारदार शस्त्रांचा वापर झाल्याची शक्यता असून हल्ला इतका भीषण होता की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार टोळीयुद्धातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र नेमका वाद कशावरून झाला, याचा तपास अद्याप सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकेबंदी केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांकडून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


