Sunetra Pawar Calls Uddhav Thackeray : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून या निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही पाठिंब्यासाठी विनंती करण्याची तयारी पक्षाने केली आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार या ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून या वेळी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे, काँग्रेसकडून बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांत उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय कसा साधला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीसह राहुरी मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. बारामतीची जागा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या मागणीवर काय भूमिका घेतात, तसेच बारामतीची निवडणूक बिनविरोध होते का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


