नवी दिल्ली : इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. विमानसेवेवरही परिणाम होत आहे. त्यात दिल्लीहून लंडन, दुबई आणि न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानांच्या भाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षानंतर, पश्चिम आशियाई हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विमान कंपन्यांना लांबच्या मार्गांवर विमानसेवा चालवण्यास भाग पडले आहे.
एटीएफच्या (ATF) किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम तिकिटांच्या दरांवर होत आहे. तिकीट बुकिंग वेबसाइट्सवर दिल्ली ते लंडन हिथ्रो थेट इकॉनॉमी क्लासच्या तिकिटाची किंमत 149479 दाखवत आहे. बिझनेस क्लासचे भाडे 179354 पर्यंत वाढले आहे. अगदी एक स्टॉप असलेल्या इकॉनॉमी क्लासचे भाडेसुद्धा 132353 पासून सुरू होते. पश्चिम आशियाई संघर्षापूर्वी, दिल्ली-लंडन इकॉनॉमी क्लासचे सरासरी भाडे 45000 ते 65000 च्या दरम्यान होते, म्हणजेच आता भाडे दुप्पटीहून अधिक वाढले आहे.
दुबईचा मार्ग आता पूर्वीसारखा सोपा राहिलेला नाही. दिल्ली-दुबई इकॉनॉमी क्लासचे भाडे २८७६२, तर बिझनेस क्लासचे भाडे ५५८७९ पर्यंत पोहोचले आहे. पश्चिम आशियातील तणावापूर्वी, दिल्ली-दुबईचे भाडे १२००० ते २०००० च्या दरम्यान होते. इंडिगोच्या वेबसाइटवर, न्यूयॉर्क (जेएफके) ते दिल्लीचे भाडे एका थांबासह अंदाजे २०५०००पासून सुरू होते. दिल्ली ते न्यूयॉर्कची तिकिटे दोन थांबे घेऊन १२६१८१ पासून सुरू होतात.


