Vadgaon Maval : वडगाव मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. स्पष्ट बहुमत असतानाही सभापती-उपसभापती निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पक्षात खळबळ उडाली आहे.
१८ पैकी १३ सदस्यांचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ ७ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवाराला ११ मते मिळाली. यावरून पक्षातील सहा सदस्यांनी बंडखोरी करत विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पराभवानंतर आमदार सुनील शेळके यांनी संताप व्यक्त करत पक्षाच्या सर्व १३ सदस्यांना तातडीने राजीनामे सादर करण्याचे आदेश दिले. पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे आणि तालुकाध्यक्ष गणेश खांडगे उपस्थित होते. बैठकीत भविष्यात अशा प्रकारची गद्दारी सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
आमदार शेळके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “उमेदवार मी देतो, खर्च मी करतो, तरी पक्षाशी गद्दारी केली जाते. संबंधित सदस्यांची माहिती माझ्याकडे आहे. पक्षाशी निष्ठा असेल तर सर्वांनी राजीनामे द्यावेत, अन्यथा हकालपट्टी केली जाईल.”
या निर्णयामुळे १३ सदस्यांमध्ये मोठे टेन्शन निर्माण झाले असून प्रत्यक्षात किती जण राजीनामे देतात, याकडे आता संपूर्ण मावळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


