Baramati By Election 2026: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठा पेच सुटला आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली आहे. या निर्णयामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
काँग्रेसने माघार का घेतली?
पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी या निर्णयामागची सविस्तर भूमिका मांडली. ते म्हणाले, “शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पहाटेच भेट घेऊन, अजित पवारांच्या निधनानंतरची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्याची विनंती केली. स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही याबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या विनंतीचा मान राखणे आवश्यक होते. राजकीय विचारधारेनुसार आम्ही भाजपच्या विरोधात आहोत आणि लढण्याची आमची तयारीही होती. परंतु, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि मानवी संवेदना लक्षात घेऊन आम्ही बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ फोन आणि सपकाळांचे स्पष्टीकरण
या घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्याबाबत सपकाळ म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन आला होता, हे सत्य आहे. त्यांनी ‘राजकीय संस्कृती’ जपण्याचा शब्द वापरला. मात्र, आमचा निर्णय हा केवळ त्यांच्या फोनमुळे झालेला नाही, तर मविआतील मित्रपक्षांशी झालेल्या चर्चेनंतर आणि हायकमांडच्या संमतीने घेतला आहे.”


