Baramati By-Election 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका फोन कॉलने मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, काँग्रेस आपला उमेदवार रणांगणातून मागे घेण्याच्या तयारीत आहे.
पवारांच्या एन्ट्रीने बदललं समीकरण
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांनी थेट दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संवाद साधला. या चर्चेनंतर काँग्रेसने मवाळ भूमिका घेत माघार घेण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता केवळ हायकमांडच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करत असून, दुपारी २ वाजेपर्यंत आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते.
काँग्रेस नेत्यांचे ‘सकारात्मक’ संकेत
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले, “दिवंगत अजित पवार यांच्याबद्दल जनतेच्या मनात असलेल्या आदरापोटी ही निवडणूक लढवू नये, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ भावना होती. प्रदेश पातळीवर नेत्यांचे एकमत झाले असून, आम्ही तसा प्रस्ताव हायकमांडला दिला आहे. दिल्लीचा आदेश येताच पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.”
‘बिनविरोध’साठी सर्वपक्षीय प्रयत्न
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केवळ महायुतीच नाही, तर शरद पवार गटानेही पुढाकार घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करून राजकीय सौजन्य राखण्याची विनंती केली होती. या सामूहिक प्रयत्नांना यश मिळताना दिसत असून, बारामतीची निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
राजकीय सौजन्याचा नवा पायंडा?
राजकीय मतभेद बाजूला ठेवून एका नेत्याच्या निधनानंतरची जागा बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची जुनी परंपरा पुन्हा एकदा जपली जाण्याची चिन्हे आहेत. जरी भाजपने काही पूर्वीच्या निवडणुकांमध्ये ही परंपरा मोडल्याची टीका काँग्रेसने केली असली, तरी अजित पवारांच्या निधनाची भावनिक किनार लक्षात घेता काँग्रेसने ‘मोठेपण’ दाखवण्याचे ठरवले आहे.


