Baramati Election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणध्रामधुमीत आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. बारामतीतून काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याबाबत पक्षात सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, यामुळे राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “बारामती पोटनिवडणुकीच्या सद्यस्थितीबाबत काँग्रेसमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. उमेदवार मागे घेण्याबाबत पक्ष सकारात्मक असून आम्ही तसा प्रस्ताव दिल्लीतील हायकमांडकडे पाठवला आहे. मात्र, यावर अंतिम शिक्कामोर्तब हायकमांड करेल आणि जो काही निर्णय दिल्लीतून येईल, तो आम्हाला मान्य असेल.”
सुनेत्रा पवारांची ‘फोन डिप्लोमसी’ यशस्वी ठरणार?
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही सपकाळांची भेट घेतल्याने काँग्रेसवरील दबाव वाढल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्ष (ठाकरे गट आणि शरद पवार गट) सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत असताना काँग्रेसने वेगळी चूल मांडल्याने आघाडीत बिघाडीची चर्चा सुरू झाली होती.
भावनिक किनार आणि राजकीय पेच
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने याला मोठी भावनिक किनार आहे. महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, काँग्रेसने उमेदवार उभा केल्यामुळे ही जागा बिनविरोध होण्यात अडथळा निर्माण झाला होता. आता वडेट्टीवारांच्या विधानानंतर काँग्रेस आपला उमेदवार ‘आकाश मोरे’ यांची माघार घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


