Beed News : बीड जिल्ह्यातील परळी येथे लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विहीर बांधकामाच्या बिलावर सही करण्यासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला ACB च्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ देविदासराव गोरे असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदाराच्या विहीर बांधकामाच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी गोरे यांनी सुरुवातीला १,००० रुपयांची मागणी केली होती. नंतर तडजोडीअंती ५०० रुपये घेण्याचे ठरले.
तक्रारदाराने याबाबत तक्रार केल्यानंतर ACB ने सापळा रचला. पंचायत समिती परिसरात लाचेची मागणी झाल्यानंतर, गोरे यांनी आपल्या खासगी कार्यालयात ही रक्कम स्वीकारताच ACB पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.


