Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील निकालावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री नसीम खान यांचा पराभव केला होता. मात्र या निकालावर आक्षेप घेत नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी संबंधित मतदारसंघातील EVM मशीनची तपासणी आणि छाननी करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीनंतर अशा प्रकारची EVM तपासणी करण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.
EVM तयार करणारी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ ही कंपनी 16 आणि 17 एप्रिल रोजी मुंबईत येऊन मशीनची निदान चाचणी करणार आहे. ही प्रक्रिया उमेदवार आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या निर्णयानंतर नसीम खान यांनी समाधान व्यक्त करत, हा आदेश ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. चांदिवली मतदारसंघ हा यापूर्वी खान यांचा बालेकिल्ला मानला जात होता, त्यामुळे या निकालाबाबत अधिक तपासणी होणं महत्त्वाचं असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


