Shashikant Shinde : राज्यात निवडणुकांचा टप्पा संपल्यानंतर आता पक्षवाढीच्या राजकारणाला वेग आला असून, विविध पक्षांतील नेते महायुतीत प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘ऑपरेशन लोटस’ आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी दिली आहे.
महेश शिंदे म्हणाले की, शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचे पहिले स्वागत आपणच करू. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाला मान्यता देत भाजपमध्येही यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. महायुतीत येण्याचे आवाहन करत “ते तिकडे कशाला थांबलेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याबाबत बोलताना महेश शिंदे यांनी स्पष्ट केले की, ओबीसींवर कोणताही अन्याय झालेला नाही. त्यांच्या माहेरच्या वंशावळीत कुणबीचा उल्लेख असल्याने दाखला वैध असल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे माध्यमांनी ट्रायल करू नये, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे सांगत आगामी काळात सर्व काही सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत कार्यकर्त्यांना तळागाळात जाऊन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कामाचा आढावा घेतला जाईल आणि काम न करणाऱ्यांवर थेट कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


