Sharad Pawar : राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत पवार यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. त्यांच्या मते, वारकरी संप्रदायातील सुमारे ६० टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. समतेचा संदेश देणाऱ्या या चळवळीत अशा प्रवृत्ती वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या पार्श्वभूमीवर पुरोगामी विचार मांडणाऱ्या कीर्तनकारांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या सुमारे ४० जण असे आहेत, जे कीर्तन-प्रवचनातून प्रगतिशील भूमिका मांडत आहेत आणि त्यांची गरज अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याचबरोबर या प्रबोधनाच्या कार्यात महिलांची उपस्थिती कमी असल्याबद्दलही पवार यांनी खंत व्यक्त केली. दरम्यान, दिल्लीत पार पडणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, या संमेलनात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर चर्चा होणार आहे.
पवार यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात वारकरी संप्रदाय आणि राजकारण यावर नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


