पुणे : जेईई मेन्स 2025 सत्र दोन परीक्षेचे वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने जाहीर केले आहे. सत्र दोनची परीक्षा 2 एप्रिलपासून सुरू होईल आणि 9 एप्रिलपर्यंत चालेल. जेईई मेन्स सत्र दोनच्या परीक्षा आणि सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षेचे काही पेपर एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जेईई मेन्स 2025 सत्र दोन पेपर-1 बीई / बीटेक परीक्षा 2, 3, 4, 7 आणि 8 एप्रिल रोजी होणार आहे. पहिल्या चार दिवसांत ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा पहिल्या सत्रात सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्रात दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत घेतली जाईल. तर 8 एप्रिल रोजी परीक्षा फक्त दुपारच्या सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या तारखांवर पुनर्विचार करण्याची विनंती एनटीएला केली आहे. परंतु, अद्याप एनटीएने जेईई मेन्स सत्र दोनच्या परीक्षेच्या तारखेत बदलाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


