Sonali Jadhav murder : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रिलस्टार सोनाली जाधव (वय ३४) हिच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून प्रियकरानेच तिचा खून केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
सोनाली जाधव सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून पोस्ट करत होती आणि परिसरात रिलस्टार म्हणून ओळख निर्माण केली होती. तिचा १६ वर्षांपूर्वी विवाह झाला होता, मात्र काही कारणांमुळे ती पतीपासून वेगळी राहून माहेरी राहत होती.
याच दरम्यान तिचे गावातीलच तुकाराम गावंधरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. मात्र, सोनाली इतर व्यक्तीसोबत फिरत असल्याचा संशय आरोपीला आला होता. याच रागातून त्याने ६ एप्रिल रोजी, सोनालीच्या वाढदिवशीच ‘गिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने तिला मोटारसायकलवरून बाहेर नेले.
दोन दिवस ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी करकंब पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर रोपळे परिसरातील कालव्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ओळख पटविल्यानंतर तो मृतदेह सोनालीचाच असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी संशयित तुकाराम गावंधरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सोनालीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


