Maharasahtra Heatwave : महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट तीव्र होत असून विशेषतः विदर्भ भागात तापमानाने उच्चांक गाठला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४२ अंश सेल्सियसच्या पुढे गेले असून, नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
विदर्भातील तापमानाचा आढावा घेतला असता, अमरावती आणि वर्धा येथे ४४.४अंश, नागपूर, वाशीम आणि गडचिरोली येथे सुमारे ४४ अंश तापमान नोंदवण्यात आले आहे. अकोल्यात ४४.१ अंश तर चंद्रपूरमध्ये ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
याशिवाय भंडारा (४२ अंश), गोंदिया ४२.९ अंश, यवतमाळ (४२.८ अंश) आणि बुलढाणा (४१.२ अंश) येथेही तापमान उच्च पातळीवर आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उष्णतेच्या या तीव्र लाटेमुळे जनजीवनावर परिणाम होत असून, पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


