Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर वर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून निष्काळजीपणामुळे एक निरपराध चिमुकल्याचा जीव गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर टोल नाक्याजवळ हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस सकाळी सहाच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले होते, असा गंभीर आरोप प्रवाशांनी केला आहे. याच निष्काळजीपणामुळे बसने नियंत्रण गमावून दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे तब्बल एक तास डॉक्टर उपलब्ध नसल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत आक्रोश केला. सध्या गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, चालकांच्या बेफिकीर वर्तनावर कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.


