नवी दिल्ली : सध्या व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढताना दिसत आहे. त्यात इन्स्टाग्राम एका नवीन प्रयोगाद्वारे सोशल मीडियाच्या जगात खळबळ माजवत आहे. कंपनी ‘इन्स्टंट्स’ नावाच्या एका नवीन इमेज-शेअरिंग ॲपची चाचणी करत आहे, ज्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ ठराविक कालावधीनंतर आपोआप गायब होतील.
मेटाच्या या निर्णयाकडे स्नॅपचॅट आणि बीरिअलसारख्या प्लॅटफॉर्मला थेट स्पर्धा म्हणून पाहिले जात आहे. इन्स्टाग्रामने सध्या इटली आणि स्पेनसह निवडक देशांमध्ये ‘इन्स्टंट्स’ ॲपची चाचणी सुरू केली आहे. हे ॲप एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म म्हणून सादर केले जात आहे आणि ते गूगल प्ले स्टोअरवर देखील लिस्टेड केले गेले आहे. मात्र, ते अद्याप सामान्य वापरकर्त्यांसाठी डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध नाही.
इन्स्टाग्रामच्या सध्याच्या प्लॅटफॉर्मवर अल्गोरिदम आणि एडिट केलेल्या कंटेंटचे वर्चस्व असताना, ‘इन्स्टंट्स’ पूर्णपणे वेगळ्या तत्त्वज्ञानाने डिझाइन केले गेले आहे. वास्तविक जीवनातील, एडिट न केलेले फोटो त्वरित शेअर करण्यावर त्याचा भर आहे.
या ॲपद्वारे पाठवलेले फोटो किंवा व्हिडिओ फक्त एकदाच पाहता येतात आणि ते जास्तीत जास्त २४ तासांसाठी उपलब्ध असतात, त्यानंतर ते आपोआप नाहीसे होतात. युजर हलका मजकूर जोडू शकतात, परंतु फिल्टर्स किंवा प्रगत संपादन (ॲडव्हान्स्ड एडिटिंग) उपलब्ध नाही.


