Monkey Catch Scheme: महाराष्ट्रामध्ये माकड आणि माणूस यांच्यातील वाढता संघर्ष पाहता राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरे आणि गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या माकडांना जेरबंद करण्यासाठी सरकारने आता बक्षीस जाहीर केले आहे. जो कोणी माकड पकडेल, त्याला प्रत्येक माकडामागे 600 रुपयांची रक्कम दिली जाईल. महाराष्ट्र सरकारने 22 एप्रिल रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे.
माकडांचा उपद्रव आणि ‘कॅश फॉर कॅच’ योजना
शहरे आणि नागरी वस्त्यांमध्ये ‘रीसस मकाक’ आणि ‘हनुमान लंगूर’ या प्रजातींच्या माकडांची संख्या प्रचंड वाढली आहे. ही माकडे घरात घुसून नासधूस करणे, वस्तू चोरणे किंवा नागरिकांवर हल्ले करणे अशा घटना सतत घडत आहेत. यावर उपाय म्हणून वनविभागाने ‘पकडा आणि पैसे मिळवा’ (Cash for Catch) हा उपक्रम सुरू केला आहे. या योजनेनुसार, माकडे पकडण्यासाठी जाळी आणि पिंजऱ्यांचा वापर केला जाईल. विशेष म्हणजे, पारदर्शकता राखण्यासाठी पकडलेल्या प्रत्येक माकडाचा फोटो काढला जाईल आणि त्यानंतर त्यांना शहरापासून किमान 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरक्षित जंगलात सोडले जाईल.
600 ची रक्कम आणि सुरक्षेचा प्रश्न
सरकारने जाहीर केलेली 600 रुपयांची रक्कम सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे. माकड पकडणे हे अत्यंत कसब आणि जोखमीचे काम आहे. अनेकदा माकडे हिंसक होतात, ज्यामुळे पकडणाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत, अवघ्या 600 रुपयांसाठी इतका मोठा धोका कोण पत्करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
माकडांवरील हल्ले आणि वनविभागाची कारवाई
दुसरीकडे, माकडांच्या त्रासामुळे काही ठिकाणी त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. येऊर वनक्षेत्रात दोन माकडांवर बाणांनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाची वनविभागाने गंभीर दखल घेतली असून, गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यास 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 20 आणि 22 मार्च रोजी वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अन्वये याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हेगारांचा शोध सुरू
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माकडांवर हल्ले करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी 3 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत प्राण्यांना इजा पोहचवणे हा गंभीर गुन्हा असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. एकीकडे माकडांना पकडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असताना, दुसरीकडे त्यांना इजा करणाऱ्यांविरोधातही सरकारने कडक पावले उचलली आहेत.


