Devendra Fadnavis: जागतिक पातळीवर आर्थिक मंदीची चर्चा सुरू असतानाच, भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगात सर्वांत गतिमान पद्धतीने पुढे जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “आज भारताच्या तिजोरीत परकीय चलनाचा इतका प्रचंड साठा आहे की, देशावरील ९४ टक्के विदेशी कर्ज आपण एका दिवसात फेडू शकतो,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘फ्रेजाईल फाईव्ह’ ते ५ ट्रिलियन डॉलर्सचा प्रवास
मागील काँग्रेस प्रणित युपीए (UPA) सरकार आणि सध्याचे एनडीए सरकार यांच्या काळातील आर्थिक स्थितीची तुलना करताना फडणवीस म्हणाले की, भारताने एक असाही काळ पाहिला आहे जेव्हा देश कर्जाच्या खाईत होता आणि जगातील कमकुवत (Fragile Five) अर्थव्यवस्थांमध्ये आपली गणना होत होती.
त्यांनी पुढे सांगितलं की, त्याकाळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेने भारताला कर्जबाजारी होण्याचा इशारा दिला होता, कारण आपल्याकडे आयातीसाठी केवळ महिनाभराचेही परकीय चलन शिल्लक नसायचे. मात्र, आज भारताने जवळपास ३४५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, देश लवकरच ५ ट्रिलियन डॉलर्सची चौथी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर आहे.
दरम्यान, मोदी सरकारच्या काळात भारताच्या विकासाचा रथ वेगाने धावत आहे. आर्थिक मंदीच्या गप्पा मारणाऱ्यांना चालू वर्षातील ७ टक्क्यांहून अधिकचा विकास दर हे चोख उत्तर आहे. भारताचे आर्थिक भविष्य अत्यंत सुरक्षित आणि उज्ज्वल आहे, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.


