Food Poisoning Case: दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. बिर्याणीची मेजवानी आणि त्यानंतर केलेल्या कलिंगडाच्या सेवनानंतर केवळ 5 तासांत हे हसते-खेळते कुटुंब संपले आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून त्या रात्रीचा थरारक घटनाक्रम समोर आणला आहे.
काय घडलं ‘त्या’ रात्री?
पोलीस तपासानुसार, ‘त्या’ रात्रीचा घटनाक्रम अत्यंत धक्कादायक आहे. रात्री 10:00 वाजता अब्दुल्ला आणि नसरीन डोकाडिया यांच्या घरी नातेवाईकांसाठी बिर्याणीची मेजवानी होती. एकूण 9 जणांनी एकत्र जेवण केले. रात्री 1:30 वाजता पाहुणे निघून गेल्यावर डोकाडिया दांपत्य आणि त्यांच्या दोन मुलींनी फ्रिजमधील कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. फॅमिली डॉक्टरने प्राथमिक औषध दिले, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. प्रकृती चिंताजनक झाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना चादरीची झोळी करून चौथ्या मजल्यावरून खाली आणण्यात आले.
मृत्यूआधीचा शेवटचा जबाब
जेजे रुग्णालयात दाखल केल्यानंतर, मृत्यूशी झुंज देणाऱ्या अब्दुल्ला यांनी पोलिसांना आदल्या रात्रीचा सर्व घटनाक्रम सांगितला. “रात्री बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाल्ले,” अशी माहिती त्यांनी दिली. दुर्दैवाने, हा जबाब दिल्यानंतर काही वेळातच अब्दुल्ला यांचीही प्राणज्योत मालवली. त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तपासाचे तीन मुख्य पैलू आणि FDA कडे नमुने
पायधुनी पोलिसांनी या प्रकरणी ‘अकस्मिक मृत्यू’ (ADR) नोंदवला असून तपास तीन दिशांनी सुरू आहे:
1. अन्नातून विषबाधा: बिर्याणीमध्ये काही विषारी अंश होते का? (मात्र इतर 5 पाहुणे सुरक्षित असल्याने हा संशय कमी आहे).
2. कलिंगडाचा परिणाम: शिल्लक राहिलेले अर्धे कलिंगड अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तपासणीसाठी पाठवले आहे.
3. चुकीचे अन्नसंयोजन (Food Reaction): बिर्याणी आणि कलिंगड यांच्या एकत्रित सेवनामुळे शरीरात काही घातक रासायनिक प्रक्रिया झाली का?
वैद्यकीय मत आणि भीतीचे वातावरण
डॉक्टरांच्या मते, मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण शवविच्छेदन (Post-mortem) आणि व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत परिसरात नागरिकांमध्ये अन्नातून होणाऱ्या विषबाधेबाबत आणि ‘फूड कॉम्बिनेशन’बाबत भीतीचे वातावरण आहे. पोलीस आता रासायनिक विश्लेषणाच्या अहवालाची वाट पाहत आहेत.


