Solapur Politics : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्याला एक जागा मिळण्याची शक्यता गृहित धरून पक्षात हालचालींना वेग आला आहे. यावेळी विधानसभा किंवा लोकसभा न लढविलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा कल दिसत असून, महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व देण्याच्या धोरणामुळे समीकरणे अधिक रंगतदार झाली आहेत.
सध्या जिल्ह्यात चार प्रमुख नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये राजश्रीताई नागणे पाटील, प्रशांत परिचारक, राजन पाटील आणि प्राध्यापक शिवाजी सावंत यांचा समावेश आहे. यापैकी एका उमेदवाराला अंतिम संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिलांना प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे सांगोल्यातील राजश्रीताई नागणे पाटील यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आणि सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांतील जनसंपर्क हे त्यांचे बलस्थान मानले जाते.
दुसरीकडे, पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनाही यावेळी संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. पक्षाच्या आदेशानुसार यापूर्वी त्यांनी निवडणूक माघार घेतल्याचा फायदा त्यांना मिळू शकतो.
अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रा. शिवाजी सावंत यांचे नावही चर्चेत असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि प्रतिस्पर्धी पक्षांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांचा रणनीतिक वापर होऊ शकतो.
दरम्यान, यापूर्वी चर्चेत असलेली काही नावे मागे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठा समाजातील मजबूत चेहरा देण्याचाही विचार सुरू असल्याने अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
निवडणूक कार्यक्रम (2026):
अधिसूचना : 23 एप्रिल
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 30 एप्रिल
छाननी : 2 मे
माघार : 4 मे
मतदान : 12 मे (सकाळी 9 ते सायं. 4)
मतमोजणी : 12 मे सायं. 5 वाजता
प्रक्रिया पूर्ण : 13 मे 2026


