Raja Shivaji Collection : रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट ठरलेला राजा शिवाजी अखेर महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला असून, रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत नवा विक्रम रचला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून दिग्दर्शनाची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. चित्रपटाची निर्मिती जेनिलिया देशमुख यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ११.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापैकी मराठी आवृत्तीतून ८ कोटी, तर हिंदी आवृत्तीतून ३.३५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘राजा शिवाजी’ने अव्वल स्थान पटकावले आहे.
एकूण १,९४१ शोमधून प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक ॲक्शन-ड्रामा चित्रपटाने ६८ टक्के इतकी प्रभावी ऑक्युपन्सी नोंदवली. प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने ५.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती, ज्यामुळे रिलीजपूर्वीच चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे, या चित्रपटाने सैराट आणि टाईमपास 2 यांचे अनेक वर्षांपासूनचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ‘सैराट’ने पहिल्या दिवशी ४.२३ कोटी, तर ‘टाईमपास २’ने ३.७५ कोटींची कमाई केली होती.
चित्रपटात बॉलिवूड आणि मराठीतील अनेक दमदार कलाकार झळकले आहेत. तसेच सलमान खान यांचा विशेष कॅमिओही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांनी चित्रपटात शिवरायांचे शूर अंगरक्षक जीवा महाला यांची भूमिका साकारली आहे.


