नवी दिल्ली : सध्या इराण-अमेरिका युद्धामुळे अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात महागाईने डोके वर काढले आहे. अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता येत्या 5-7 दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुमच्या खिशाला थेट फटका बसण्याची शक्यता आहे.
सरकार पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर आणि जागतिक ऊर्जा बाजारावरील त्याच्या परिणामावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे. अंतर्गत चर्चा सुरू असल्याने परिस्थिती गंभीर बनत आहे आणि या वाढीचा किती भार जनतेवर टाकला जावा याचा विचार सुरु आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ४ ते ५ रुपयांची वाढ होऊ शकते. सरकार सध्या एका मोठ्या पेचात सापडले आहे. एकीकडे तेल कंपन्यांचा आर्थिक दबाव आहे, तर दुसरीकडे वाढत्या महागाईची भीती आहे.
दरम्यान, आता महागाईचा फटका थेट परिणाम तुमच्या खाण्या-पिण्यावर आणि प्रवासावर होईल. इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातील कोणत्याही वाढीचा दूरगामी परिणाम होतो. जेव्हा डिझेल महाग होते, तेव्हा ट्रकचे भाडे वाढते आणि जेव्हा भाडे वाढते, तेव्हा फळे आणि भाज्यांपासून ते इतर जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्व काही महाग होते. मध्यमवर्गासाठी हे एक कठीण काम असेल, कारण त्यांचे घरगुती बजेट आधीच ताणलेले आहे.


