Pune Crime: विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा प्रेमाच्या नावाखाली रक्ताचा सडा पडला आहे. ‘माझ्याशीच लग्न कर’ असा हट्ट धरणाऱ्या एका माथेफिरू प्रियकराने, लग्नास नकार दिल्याच्या रागातून २२ वर्षीय तरुणीवर चाकूने सपासप वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. चंदननगर परिसरात घडलेल्या या थरारानंतर पीडित तरुणी गेल्या आठ दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
मैत्रीचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि पीडित तरुणी पुण्यात एका नामांकित मॉलमध्ये एकत्र काम करत होते. तिथेच त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, या नात्याचा अंत इतका भीषण असेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुणीच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या एका तरुणाशी निश्चित केले होते. ही बाब तिने दिलीपला स्पष्टपणे सांगून नातं संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या दिलीपला तिचा नकार पचवता आला नाही. २९ एप्रिलच्या रात्री ८:३० च्या सुमारास दिलीप तरुणीच्या घरी पोहोचला. तिथे त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात दिलीप कडून चाकू बाहेर काढला आणि तरुणीच्या गळ्यावर गंभीर वार केले. हल्ल्यानंतर तरुणी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची प्रकृती अजूनही अत्यंत चिंताजनक आहे.
आरोपीला बेड्या; परिसरात दहशतीचे वातावरण
या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपी दिलीप राठोड याच्या मुसक्या आवळल्या आहेत. घरात शिरून झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे परिसरात संतापाची लाट असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


