Maharashtra Politics : ठाणे महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवा परिसरातून निवडून आलेल्या तब्बल ९ नगरसेवकांविरोधात निवडणूक शपथपत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप करत न्यायालयात इलेक्शन रिट पिटीशन दाखल करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित नगरसेवकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता, आर्थिक माहिती आणि बांधकामांबाबत संपूर्ण माहिती जाहीर केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामे आणि मालमत्ता लपवल्याचाही मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देत, चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे हे गंभीर प्रकरण असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार अशा प्रकरणांमध्ये निवडणूक रद्द होण्यासह अपात्रतेची कारवाईही होऊ शकते.
या प्रकरणात रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, दीपक जाधव, साक्षी मढवी, दर्शना म्हात्रे, अर्चना पाटील, दिपाली भगत आणि स्नेहा पाटील या नगरसेवकांविरोधात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे.
सध्या हे प्रकरण न्यायालयाच्या विचाराधीन असून, या याचिकेमुळे शिंदे गटाच्या ९ नगरसेवकांच्या पदांवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. आता या प्रकरणावर शिंदे गट काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


