Maharashtra Government : आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत आणि काटकसरीचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने तातडीने तीन महत्त्वाचे निर्णय घेत प्रशासनात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने आता शासकीय कामकाजासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, प्रवास खर्च आणि इंधन बचतीसाठी सर्व प्रशासकीय बैठका ऑनलाइन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, यंदाच्या फ्रान्समधील प्रतिष्ठित ‘कान्स चित्रपट महोत्सवा’साठी महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही शिष्टमंडळ किंवा प्रतिनिधी पाठवले जाणार नाहीत.
महाराष्ट्र सरकारचे ३ मोठे निर्णय
शासकीय कामासाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर
सर्व प्रशासकीय बैठका ऑनलाइन पद्धतीने
कान्स चित्रपट महोत्सवासाठी सरकारी प्रतिनिधींना बंदी
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनीही देशहिताला प्राधान्य देत यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. कठीण काळात सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि संसाधनांचा मर्यादित वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक, मेट्रो आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा अधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, इंधन बचतीसाठी अनावश्यक परदेश दौरे टाळावेत आणि किमान एक वर्ष सोन्याची खरेदी पुढे ढकलावी, असेही त्यांनी म्हटले आहे.


