Delhi Crime: देशाच्या राजधानीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्लीच्या राणी बाग परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर धावत्या ‘स्लीपर बस’मध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरून घरी परतताना एका तरुणाला केवळ ‘वेळ’ विचारणे या महिलेसाठी भयानक ठरले. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याने दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे.
नेमकी घटना काय?
पीडित महिला मंगोलपुरी येथील एका कारखान्यात काम करते. आपली शिफ्ट संपवून रात्री उशिरा ती घरी परतत असताना, तिने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तरुणाला सहज वेळ विचारली. मात्र, त्या तरुणाने मदतीऐवजी क्रूरतेचा कळस गाठला. त्याने महिलेला बळजबरीने जवळच उभ्या असलेल्या एका स्लीपर बसमध्ये ओढले. बसमध्ये आधीच इतर आरोपी उपस्थित होते, ज्यांनी या असहाय्य महिलेवर तुटून पडत अत्याचार सुरू केले.
दोन तास धावत्या बसमध्ये अमानुष छळ
महिलेने दिलेल्या जबाबानुसार, गुन्हेगारांनी तिला बसमध्ये डांबून ठेवले आणि धावत्या बसमध्येच सुमारे दोन तास तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही बस राणी बाग ते नांगलोई या दरम्यान फिरत राहिली. या काळात पीडिता मदतीसाठी आर्त किंकाळ्या फोडत होती, मात्र रस्ते ओस असल्याने आणि बसमधील आवाजामुळे तिचा आवाज बाहेर पोहोचू शकला नाही. नराधमांनी तिला केवळ शारीरिक इजाच केली नाही, तर तीव्र हिंसाचारही केला. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तिला जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले आणि तिथून पळ काढला.
पोलीस तपास आणि सीसीटीव्ही फुटेज
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून पीडितेची वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये बलात्काराची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्लीपर बस जप्त केली असून आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून, लवकरच सर्वांना अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
‘मी रुग्णालयात राहिली तर मुलांचे काय?’ – पीडितेची व्यथा
पीडित महिला पीतमपुरा येथील झोपडपट्टीत राहते. तिचा पती दीर्घकाळापासून आजारी असून तीन लहान मुलींच्या संगोपनाची आणि घराची संपूर्ण जबाबदारी तिच्या एकटीवर आहे. गंभीर जखमी असतानाही तिने रुग्णालयात भरती होण्यास नकार दिला. “जर मी रुग्णालयात राहिले, तर माझ्या मुलांचे पोट कोण भरणार?” असा आर्त सवाल तिने उपस्थित केला. गरिबी आणि कौटुंबिक जबाबदारीमुळे तिला या भीषण धक्क्यातून सावरण्यापूर्वीच पुन्हा कामाच्या चिंतेने ग्रासले आहे. महिला सुरक्षा आणि अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


