Pune Crime : पुण्यातील येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक कैदी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
फरार झालेल्या कैद्याचे नाव जनार्दन शंकर अडसूळ असे असून तो भवानी पेठेतील काशेवाडी परिसरातील रहिवासी आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता आणि न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
कारागृहातील चांगल्या वर्तनामुळे आडसुळे याची रवानगी खुल्या कारागृहात करण्यात आली होती. येथे तो शेतीची कामे करत होता. मात्र, १२ मे रोजी कामावर असताना त्याने सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून सुटका करत पलायन केले. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली, मात्र त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.
या प्रकरणी कारागृह प्रशासनाचे अधिकारी चंद्रकांत सयाजी खांदवे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, येरवडा कारागृहातून कैदी फरार होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी ८ मे रोजी संतोष लक्ष्मण भिंगारे हा जन्मठेपेचा कैदीही पळून गेला होता. त्याचा अद्याप शोध लागलेला नसताना आणखी एक कैदी फरार झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
सध्या पोलिसांकडून दोन्ही फरार कैद्यांचा शोध सुरू असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेची चौकशीही केली जाण्याची शक्यता आहे.


