Ladki Bahin Yojna: राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळण्यात अचानक आलेल्या अडचणींमुळे लाभार्थी महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. राज्यातील अनेक महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित ३,००० रुपये मिळाले असले, तरी जानेवारी २०२६ पासून लाखो पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा मासिक हप्ता जमा झालेला नाही. “सर्व अटी पूर्ण करूनही आमचा हप्ता का रोखला?” असा संतप्त सवाल आता महिला विचारू लागल्या आहेत.
राज्याच्या विविध भागांतून सध्या या संदर्भात तक्रारींचा ओघ वाढला आहे. अनेक महिलांनी बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करूनही त्यांचे पैसे अडकले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या महिलांकडे साधी दुचाकीही नाही, त्यांच्या नावे सरकारी पोर्टलवर चक्क चारचाकी वाहने नोंदवली गेल्याचे समोर आले आहे. डिजिटल प्रणालीतील या गंभीर त्रुटींमुळे खऱ्या लाभार्थ्यांनाही अपात्रतेचा फटका बसत असल्याचा आरोप होत आहे.
सोलापूर अन् जालन्यात महिलांचा थेट कार्यालयांवर धडक मोर्चा
योजनेचा लाभ अचानक खंडित झाल्याने संतप्त झालेल्या सोलापूर आणि जालना जिल्ह्यातील महिलांनी महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांवर थेट मोर्चा नेला. सोलापुरात तर तब्बल दोन हजारांहून अधिक महिलांनी एकत्र येत थेट प्रशासकीय कार्यालयात धडक दिली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. “कागदपत्रांची पूर्तता आणि ई-केवायसी करूनही आमचे हप्ते का थांबवले?” या महिलांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांचीही बोलती बंद झाली. तक्रारींची संख्या एवढी प्रचंड होती की, परिस्थिती हाताळताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
५० लाखाहून अधिक महिला लाभापासून वंचित; तांत्रिक त्रुटींचा डोंगर
विश्वसनीय माहितीनुसार, जानेवारी २०२६ पासून राज्यातील जवळपास अर्ध्या कोटींपेक्षा (५० लाख) जास्त महिलांचे हप्ते रखडले आहेत. यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ४ लाख महिलांचा समावेश आहे. काही महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे पैसे मिळाले, तर काहींना जानेवारीपासून एकही रुपया मिळालेला नाही.
अपात्रतेचे अजब निकष आणि पोर्टलचा घोळ
आरटीओ आणि पोर्टलचा ताळमेळ नाही: योजनेच्या नियमानुसार कुटुंबात चारचाकी वाहन नसावे ही अट आहे. मात्र, वाहन नसतानाही पोर्टलवर नाव आल्याने महिलांनी आरटीओ कार्यालयात धाव घेतली. आरटीओच्या तपासात महिलांच्या नावावर कोणतेही वाहन नसल्याचे स्पष्ट झाले, म्हणजेच सरकारी पोर्टलवरील चुकीच्या डेटा एन्ट्रीमुळे महिलांना फटका बसत आहे.
इतर तांत्रिक कारणे:
याशिवाय एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला दाखवणे, वयाची चुकीची नोंद असणे, तसेच अत्यल्प उत्पन्न असतानाही थेट ‘आयकरदाते’ (Incometax Payee) म्हणून नोंद होणे अशा अनेक तांत्रिक चुका समोर आल्या आहेत. या संपूर्ण गोंधळामुळे महाराष्ट्रातील महिला वर्गात सध्या सरकारविरोधात तीव्र नाराजी असून, या तांत्रिक चुका दुरुस्त करून शासन पुन्हा कधी हप्ते सुरू करणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.


