NCP New Strategist: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या निवडणूक रणनीतीत अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाला ‘गुलाबी रंग’ देणारे जुने रणनीतीकार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या संस्थेऐवजी आता देशातील नामांकित राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात येणार आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी या नव्या ‘चाणक्यां’ची निवड केली आहे.
काल, १९ मे रोजी सकाळी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी रणनीतीवर सखोल चर्चा होऊन प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. येत्या दोन दिवसांत सर्व कायदेशीर आणि अधिकृत प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जूनपासून प्रशांत किशोर यांची कंपनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करण्यास सुरुवात करेल. आगामी ३ वर्षे पक्षासाठी अत्यंत मोलाची असल्याने, पक्षाने आतापासूनच २०२९ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.
कोण आहेत प्रशांत किशोर (PK)?
राजकीय वर्तुळात ‘पीके’ या नावाने प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर हे देशातील आघाडीचे राजकीय रणनीतीकार आणि ‘जन सुराज पक्षा’चे संस्थापक आहेत.
- राष्ट्रीय ओळख: २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठी यशस्वी प्रचार मोहीम राबवल्यानंतर ते देशभरात प्रकाशझोतात आले.
- यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड: त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी (TMC), आंध्र प्रदेशात वाय. एस. जगन मोहन रेड्डी (YSRCP), तामिळनाडूत एम. के. स्टॅलिन (DMK) आणि दिल्लीत आम आदमी पार्टी (AAP) अशा अनेक बड्या नेत्यांसाठी आणि पक्षांसाठी निवडणूक जिंकवून देणारी रणनीती आखली आहे.
- पार्श्वभूमी: राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघासोबत (UN) सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात तब्बल ८ वर्षे काम केले आहे.
‘गुलाबी कॅम्पेन’ आणि नरेश अरोरांचा प्रवास
यापूर्वी राष्ट्रवादीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी ‘डिझाईन बॉक्स’ या कंपनीचे सहसंस्थापक नरेश अरोरा यांच्याकडे होती. राजकीय ब्रँडिंग, प्रतिमा निर्मिती (Image Makeover) आणि संदेश व्यवस्थापनात तरबेज असलेल्या अरोरा यांनी यापूर्वी राजस्थान आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये काँग्रेससाठी मोठी कामगिरी केली होती.
लोकसभा निवडणुकीतील राजकीय धक्क्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाला नव्याने उभारी देण्याची जबाबदारी अरोरा यांच्या टीमने घेतली होती. महाराष्ट्रात गाजलेल्या ‘लाडकी बहीण योजने’च्या घोषणेनंतर अजित पवारांचे ‘गुलाबी जॅकेट’ आणि संपूर्ण ‘गुलाबी कॅम्पेन’ नरेश अरोरा यांच्याच कल्पकतेतून साकारले होते, ज्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठ्या यशाच्या रूपात मिळाला. मात्र, अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर ‘डिझाईन बॉक्स’ने आपले काम थांबवले होते. आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आगामी काळातील आव्हाने पाहता प्रशांत किशोर यांच्यासारख्या अनुभवी चेहऱ्याला सोबत घेत पक्षाची नवीन घोडदौड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


