PMPML Bus Routes Changed: पुण्यात मेट्रो नेटवर्कचा विस्तार वेगाने होत असतानाच, दुसरीकडे मात्र याचा थेट फटका सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या नागरिकांना बसू लागला आहे. स्वारगेट ते कात्रज या ‘पर्पल लाईन’वरील भुयारी मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाल्याने, कात्रज परिसरातील ‘PMPML’चे अनेक महत्त्वाचे बस थांबे तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले आहेत. २० मे पासून लागू झालेली ही नवी व्यवस्था पुढील आदेश येईपर्यंत अशीच कायम राहणार असल्याने प्रवाशांना आता नव्या थांब्यांवरून बस पकडावी लागणार आहे.
कात्रज चौकात बदललेली नवी बस व्यवस्था:
मेट्रोच्या बांधकामात कोणताही अडथळा येऊ नये आणि प्रवाशांची सुरक्षा राखली जावी, म्हणून कात्रज पोलीस चौकीजवळील मुख्य थांबा बदलण्यात आला आहे. सुधारित मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
- कात्रज बायपास पुलाखालील थांबे: मार्ग क्रमांक २, २अ, ११के, २४, २४अ, ९०, २३५, २३६, ३०१, ३०१अ, के११, के१२, के१३, के१४, के१८ या बसेससह ‘रातराणी १ आणि २’ या बस आता पुलाखालून सुटतील
- गुजरवाडी बस स्टँड मार्ग: मार्ग क्रमांक ४२, २९८, २९९ आणि ३३९ या बसेस नेहमीप्रमाणे गुजरवाडी स्टँडवरून सुटतील, मात्र प्रवाशांसाठी त्या कात्रज चौकातील पुलाखाली थांबतील.
- बायपास रोडने धावणाऱ्या बस: मार्ग क्रमांक ४३, ४३अ, ४४, ४५, २१४ आणि २२८ या क्रमांकाच्या बसेस आता थेट कात्रज बायपास रोडने पुढे मार्गस्थ होतील.
- मार्केट यार्ड आणि बिबवेवाडी परिसरातही मेट्रोच्या कामाला गती आल्यामुळे या भागातील सर्वसामान्य वाहतुकीमध्ये मोठे बदल करून ती इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय
दक्षिण पुणे आणि उपनगरांना जोडणाऱ्या या मुख्य जंक्शनवरून रोज हजारो नागरिक प्रवास करतात. ऐन गर्दीच्या वेळी, विशेषतः सकाळी नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपी प्रशासनाने बदललेल्या थांब्यांवर माहिती फलक लावले आहेत. तसेच प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी घटनास्थळी विशेष कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. भविष्यातील सुकर प्रवासासाठी सध्या होत असलेल्या या तात्पुरत्या त्रासाबद्दल प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ‘PMPML’ आणि मेट्रो प्रशासनाकडून संयुक्तपणे करण्यात आले आहे.


