Solapur Barshi Crime: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराजवळून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बार्शी-परंडा रस्त्यावर आज दुपारी दिवसाढवळ्या एका पतीने आपल्याच पत्नीवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केली. अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर झालेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीचा जीव घेतल्यानंतर आरोपी पती रक्ताने माखलेला चाकू घेऊन स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला.
संशयाचे भूत आणि दुर्दैवी अंत
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आणि आरोपी हे दोघेही एका खासगी बँकेत एकत्र कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यात सूत जुळले आणि त्यांनी प्रेमविवाह (Love Marriage) केला होता. सुखाचा संसार सुरू असतानाच, गेल्या काही दिवसांपासून पतीच्या मनात पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशयाचे भूत निर्माण झाले होते. याच कारणावरून दोघांमध्ये आज दुपारी बार्शी-परंडा रस्त्यावर जोरदार भांडण झाले.
भररस्त्यात चाकूने सपासप वार
रस्त्यावरील हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी ऋषिकेश पाटील याने रागाच्या भरात सोबत आणलेला तीक्ष्ण चाकू काढला आणि पत्नी धनश्री पाटील हिच्यावर हल्ला चढवला. ऋषिकेशने धनश्रीवर चाकूने एकामागून एक अनेक वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेली धनश्री रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी पोलीस कोठडीत
भररस्त्यात हा भयानक प्रकार घडवून आणल्यानंतर ऋषिकेश पाटील याने थेट बार्शी पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला तात्काळ बेड्या ठोकून ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी बार्शी पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


