Solapur Gram Panchayat Election: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा आखाडा आता चांगलाच तापू लागला आहे. जिल्ह्यातील एकूण ७०१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांच्या आरक्षण निश्चितीचा अधिकृत आराखडा राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला आहे. आगामी १२ जून रोजी आयोजित विशेष ग्रामसभांमध्ये विविध प्रवर्गांच्या आरक्षणाची लॉटरी (सोडत) काढली जाणार असून, ८ जुलै रोजी आरक्षणाची अंतिम रचना जाहीर केली जाईल. या घोषणेमुळे सोलापूरच्या ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.
या ग्रामपंचायतींसाठी होणार प्रक्रिया
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सन २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या, तसेच डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबवली जात आहे. यामुळे गेल्या काही काळापासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे.
८ जूनला पूर्वकल्पना; १२ जून रोजी ठरणार गावांचे भवितव्य
आरक्षण प्रक्रियेची रीतसर सुरुवात सोमवार, ८ जून रोजी विशेष ग्रामसभेची नोटीस काढून केली जाईल. त्यानंतर शुक्रवार, १२ जून रोजी प्रत्यक्ष ग्रामसभांचे आयोजन केले जाईल. तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही सोडत काढण्यात येईल. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि या सर्व प्रवर्गांतील महिलांसह सर्वसाधारण (General) महिलांसाठी जागा आरक्षित केल्या जातील.
प्रभागनिहाय प्रारूप आराखडा आणि हरकतींची संधी
१२ जूनच्या सोडतीनंतर, बुधवार १७ जून रोजी जिल्हाधिकारी या प्रभागनिहाय आरक्षणाच्या मसुद्याला मंजुरी देतील. हा मंजूर प्रारूप आराखडा शुक्रवार, १९ जून रोजी जनतेसाठी प्रसिद्ध केला जाईल. नागरिकांना या आरक्षणावर काही आक्षेप किंवा सूचना मांडायच्या असल्यास त्यांना १९ ते २५ जून या सात दिवसांचा वेळ दिला जाईल. प्राप्त हरकतींवर ३ जुलैपर्यंत छाननी व अंतिम अभिप्राय दिला जाईल आणि त्यानंतर ८ जुलै रोजी अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाईल.
स्थानिक राजकारणात गणिते मांडण्यास सुरुवात
ग्रामपंचायतीचे आरक्षण कोणत्या वॉर्डात काय पडते, यावरच अनेक प्रस्थापितांचे आणि नवख्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असते. स्वतःचा वॉर्ड सुरक्षित राहतो की आरक्षित होतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. यामुळेच या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, संभाव्य उमेदवारांनी आणि स्थानिक आघाड्यांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी व जोडतोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे.


