Cockroach Janata Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील आपले अधिकृत खाते पुन्हा सुरू व्हावे, यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) केलेली मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने ‘X’ खाते तातडीने बहाल करण्याचे आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला असून, हा सीजेपीसाठी एक मोठा कायदेशीर झटका मानला जात आहे.
एका टिप्पणीतून पक्षाची स्थापना
पूर्वी आम आदमी पक्षाचे (AAP) कार्यकर्ते राहिलेले अभिजीत दिपके यांनी १५ मे रोजी ‘कॉकरोच जनता पार्टी’ या नव्या राजकीय संघटनेची घोषणा केली होती. या पक्षाच्या स्थापनेमागे सर्वोच्च न्यायालयातील एक वादग्रस्त सुनावणी कारणीभूत ठरली. ‘सीनियर ॲडव्होकेट’ दर्जा देण्याबाबतच्या एका खटल्यादरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ‘कॉकरोच’ आणि ‘परजीवी’ अशा शब्दांचा वापर केला होता. या शब्दांवर तीव्र आक्षेप घेत आणि त्याचा निषेध नोंदवत या नव्या पक्षाची स्थापना करण्यात आली होती.
डिजिटल बंदी आणि नव्या खात्याची सोशल मीडियावरील घोडदौड
भारतात २१ मे रोजी सीजेपीचे मूळ ‘X’ हँडल ब्लॉक करण्यात आले होते. या डिजिटल कारवाईनंतर पक्षाने ‘Cockroach Is Back’ या नावाने नवीन हँडल तयार करून आपला प्रचार सुरू ठेवला. विशेष म्हणजे, या नव्या खात्याला नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद मिळत असून, अल्पावधीतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्या २,२७,००० च्या पार गेली आहे. पक्षाची ही अनोखी डिजिटल रणनीती आणि प्रतिकात्मक आंदोलन सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
हा पक्ष केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नसून तरुणांची एक नवी चळवळ असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. १६ मे पासून अधिकृतपणे कार्यरत झालेल्या या पक्षाचा मुख्य अजेंडा तरुणांचे प्रश्न मांडणे आणि प्रशासनाला जाब विचारणे हा आहे. सद्यस्थितीत, NEET-UG २०२६ परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सीजेपी आक्रमक झाली आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत त्यांनी थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मांडली स्वतःची बाजू
दरम्यान, १६ मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपल्या मूळ वक्तव्यावर एक स्पष्टीकरण जारी केले होते. माध्यमांमधील काही वृत्तांमुळे आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, “माझी ती टिप्पणी तरुणांच्या विरोधात नसून, बनावट आणि बेकायदेशीर पदव्यांच्या जोरावर वकिली क्षेत्रात येणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात होती.” माध्यमांच्या एका वर्गाने आपल्या विधानाची मोडतोड करून अपप्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


