Pune Alcohol Case: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्राशनामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. दापोडी आणि फुगेवाडी येथे आठ जणांचा मृत्यू झाला असून, पुण्यातील काळेपडळ आणि हडपसर भागातही काही जणांनी जीव गमावला आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, स्पिरिटमिश्रित अवैध दारूची निर्मिती योगेश वानखेडे नावाच्या व्यक्तीकडून करण्यात आली होती. ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांत विक्रीसाठी पाठवण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. दारू सेवन केल्यानंतर काही व्यक्तींना तोंडाला फेस येणे, अचानक तब्येत बिघडणे अशी गंभीर लक्षणे दिसून आली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, विषारी दारू तयार करण्यात आलेल्या ठिकाणांचा शोध पोलिसांनी घेतला असून या रॅकेटमागील प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या घटनेकडे केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही. निष्पाप लोकांचे जीव गेले असल्याने हा प्रकार म्हणजे थेट हत्येसमान आहे. संपूर्ण साखळी उघड करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. सध्या गंभीर अवस्थेतील रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी योगेश वानखेडे हा सराईत अवैध दारू विक्रेता असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. यापूर्वीही त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे. त्याने पुरवलेली दारू फुगेवाडी परिसरातील एका अवैध दारू अड्ड्यावर विकली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी योगेश वानखेडेसह एकूण आठ जणांना अटक केली असून आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे. घटनेनंतर फुगेवाडी परिसरात नागरिक आणि महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. अवैध दारू विक्रीवर प्रशासनाने कठोर नियंत्रण आणावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. संभाव्य तणाव लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


