Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. रखरखत्या उन्हात खाट टाकून सकाळी १० वाजता त्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
उपोषणापूर्वी काल रात्री राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी सरकारच्या वतीने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मागण्यांबाबत स्पष्ट लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीची निश्चित मुदत मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी घेतली.
बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने सरकारचे शिष्टमंडळ रिकाम्या हाताने परतले. त्यामुळे आजपासून जरांगे पुन्हा उपोषणाच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून सरकारसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.
दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाकडे राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील काही दिवसांत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता असली तरी सध्या तरी जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.


