Pune Liquor Case : पुण्यातील हडपसर परिसरात विषारी दारू प्रकरणात अनेकांचा मृत्यू झाल्यानंतरही अवैध दारू विक्री थांबलेली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मृतांच्या चिता विझण्याआधीच परिसरात पुन्हा गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री सुरू असल्याचे उघड झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कृष्णानगर, तरवडे वस्ती आणि साठे वस्ती परिसरातील हातभट्ट्यांवर टाकलेल्या कारवाईत शेकडो लिटर बनावट गावठी दारूचा साठा आढळून आला. विषारी दारूमुळे सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अवघ्या काही तासांतच त्याच परिसरात दारूचे उत्पादन सुरू असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या भागात अनेक वर्षांपासून हातभट्ट्या आणि अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. विषारी दारूकांडासारखी गंभीर घटना घडूनही संबंधित धंदे सुरूच राहिल्याने पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, ज्या भागात विषारी दारूमुळे नागरिकांचे बळी गेले, त्याच परिसरात दुसऱ्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचा साठा सापडल्याने अवैध दारू माफियांचे जाळे किती मजबूत आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणामागील संपूर्ण साखळी, आर्थिक हितसंबंध आणि संबंधितांना मिळणारे संरक्षण यांची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दोषींवर कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणीही जोर धरत आहे.


