Pune MLC Election : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून 17 जागांवर तिन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आहे. अंतिम सूत्रानुसार भाजप 11, शिवसेना (शिंदे गट) 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
या वाटपात पुणे आणि रायगडच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. पुणे मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी रविवारी रात्री राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयात सुमारे पाच तास बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील अनेक इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाल्यानंतर अखेर विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पुण्यातील या जागेसाठी दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे यांच्यासह अजित गव्हाणे, रणजित शिवतारे आणि दीपक मानकर यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, सर्व चर्चांना पूर्णविराम देत पक्षाने विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली.
विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते संजय काकडे यांचे पुत्र आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपशी संबंधित कुटुंबातील चेहऱ्याला उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून उमेदवार निश्चित झाले असले तरी काही मतदारसंघांमध्ये बंडखोरीची शक्यता कायम असल्याचे चित्र आहे.


