Sangli Crime News : सांगली येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगारात महिला कर्मचाऱ्याच्या विनयभंगाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ लिपिक विनायक कदम यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, आरोपी विनायक कदम हे सांगली आगारात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्याच कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच वारंवार अयोग्य वर्तन करत शरीरसुखाची मागणी केल्याचाही गंभीर आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, या त्रासाबाबत तिने वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, तिच्या तक्रारीची पुरेशी दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे ती मानसिक तणावाखाली होती.
अखेर महिलेने हा प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी सांगली आगारात जाऊन आरोपीला जाब विचारला. यावेळी वाद वाढल्याने त्याला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर काही काळ आगार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर कार्यालयात घुसून मारहाण केल्याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवले जात आहेत.
या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून संबंधित प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


