Sanjay Raut: शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. या अंतर्गत वादाचा फायदा उठवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील नाराज आमदारांना घरवापसीची खुली ऑफर दिली आहे. “ज्यांना सध्याच्या सत्तेत गुदमरल्यासारखे वाटत आहे, त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यावे, मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत,” असे वक्तव्य राऊत यांनी केले. मात्र, ही ऑफर देत असतानाच त्यांनी एक मोठी अटही घातली आहे. गद्दारी करणाऱ्या काही विशिष्ट बंडखोर नेत्यांना पक्षात घेण्यास कायमचा मज्जाव असेल, असे स्पष्ट करत त्यांनी काही चेहऱ्यांसाठी ठाकरेंच्या दारे कायमची बंद असल्याचे संकेत दिले आहेत.
उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचा सत्तारांना पश्चाताप
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजप उमेदवाराविरोधात अर्ज भरल्याने महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. ‘भाजप मित्रपक्षांना संपवत आहे’ या सत्तारांच्या आरोपावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “हे सत्तारांचे वैयक्तिक मत असले तरी, त्यांना आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाण्याचा पश्चाताप होत असावा.” एवढेच नव्हे तर, शिंदे गटातील अनेक आमदार अंतर्गत बैठकांमध्ये भाजपचा उल्लेख ‘स्लो पॉयझन’ (हळूहळू संपवणारे विष) असा करत असल्याची खळबळजनक माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
सत्तारांची मनधरणी सुरू, तर राऊतांमुळे राजकीय तापमान वाढले
सत्तारांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली असून, प्रमुख नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एकीकडे सत्तारांची मनधरणी करण्यासाठी तातडीने बैठकांचे सत्र सुरू असताना, दुसरीकडे संजय राऊत यांनी ‘स्लो पॉयझन’ आणि ‘घरवापसी’चा मुद्दा उपस्थित करून महायुतीची कोंडी केली आहे. राऊत यांच्या या विधानाने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा कलगीतुरा रंगला आहे.


