Traffic Violations: औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील महामार्गांवरील वाढती वाहतूक कोंडी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे. मे २०२६ या एकाच महिन्यात शहरातील ७४ हजार ६५६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ६ कोटी ७६ लाख ३० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
औद्योगिक पट्टा आणि महामार्गांमुळे वाहतुकीवर प्रचंड ताण
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हिंजवडी, चाकण, भोसरी, तळवडे, तळेगाव आणि चिखली यांसारखे महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र येतात. याशिवाय शहरातून पाच प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग जात असल्याने दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अप्पर पोलीस आयुक्त सागर आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३१ मे दरम्यान शहरभर नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबविण्यात आली.
‘नो पार्किंग’ आणि टोइंग कारवायांमध्ये सर्वाधिक नोंद
या विशेष मोहिमेत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. ‘नो पार्किंग’ नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १९ हजार ३४० वाहनचालकांवर दंड ठोठावण्यात आला, तर ११ हजार ५८० वाहने टोइंगद्वारे हटविण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिग्नल जंपिंगपासून ड्रंक अँड ड्राईव्हपर्यंत हजारो कारवाया
मे महिन्यात वाहतूक पोलिसांनी विविध प्रकारच्या नियमभंगांवर कठोर कारवाई केली. सिग्नल तोडणाऱ्या ८ हजार ४८३ वाहनचालकांवर दंड करण्यात आला, तर जड आणि अवजड वाहनांवरील ८ हजार १४२ कारवाया नोंदविण्यात आल्या. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ६ हजार ५३९ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. फॅन्सी किंवा बेकायदेशीर नंबर प्लेट वापरणाऱ्या ५ हजार ४७५ वाहनांवर, तर खाजगी ट्रॅव्हल्स बसेसवर ३ हजार ४९० कारवाया करण्यात आल्या.
याशिवाय रिक्षाचालकांवरील ३ हजार १०२, काळी काच लावलेल्या वाहनांवरील ३ हजार ९०, वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्या १ हजार ९९३, मॉडिफाइड सायलेन्सर असलेल्या दुचाकींवरील १ हजार ३२, विना परवाना वाहन चालवणाऱ्या ८७० आणि हेल्मेट न वापरणाऱ्या ४२९ जणांवरही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ४०२ चालकांवर आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्या २८४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. “वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. दंडात्मक कारवाई किंवा न्यायालयीन प्रक्रियेचा त्रास टाळण्यासाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्त बाळगणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले. शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी अशा मोहिमा भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


