Maharashtra weather : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व वातावरण अधिक सक्रिय झाले असून राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन झाल्यानंतर आता मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे यंदा मान्सून तीन दिवस उशिराने का होईना पण केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे पावसाळ्याला अधिकृत सुरुवात झाली असून आगामी काही दिवसांत तो गोवा आणि महाराष्ट्रातही पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील उष्णतेची तीव्रता कमी होऊन अनेक भागांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.


