NEET Paper Leak : ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्याप्रकरणी संशयित आरोपी मनीषा वाघमारे यांच्या जामीन अर्जावरील निर्णय दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणी न्यायालय 9 जून रोजी अंतिम आदेश देणार आहे. सुनावणीदरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) जामीन अर्जाला कडाडून विरोध केला, तर न्यायालयानेही तपास अत्यंत संवेदनशील टप्प्यावर असताना जामिनासाठी एवढी घाई का केली जात आहे, असा सवाल उपस्थित केला.
समुपदेशन शुल्काचा दावा; पुराव्यांअभावी जामीनाची मागणी
मनीषा वाघमारे यांच्या वतीने बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी त्या अधिकृत शैक्षणिक समुपदेशक (Education Counselor) असल्याचा दावा केला. त्यांच्याकडे जमा झालेली रक्कम ही समुपदेशनासाठी घेतलेली फी असल्याचे सांगण्यात आले. सीबीआयला तपासादरम्यान त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळालेला नसल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.
3.50 लाखांच्या व्यवहारावरून वाद
सीबीआयने मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या 3.50 लाख रुपयांच्या व्यवहारावर संशय व्यक्त केला आहे. मात्र, ही रक्कम पूर्वजांच्या मालमत्तेच्या ‘गिफ्ट डीड’मधून मिळाल्याचा दावा बचाव पक्षाने केला. घरावर दोन वेळा टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोणतीही बेकायदेशीर रोकड आढळून न आल्याने त्यांना कोठडीत ठेवण्याचे कारण नसल्याचे वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
वैद्यकीय कारणांवर न्यायालयाचे स्पष्ट मत
सुनावणीदरम्यान मनीषा वाघमारे या व्हर्टिगोच्या त्रासाने ग्रस्त असल्याचे आणि प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तुरुंगातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, न्यायालयाने आजारपणाचा मुद्दा जामीनाशी जोडण्यास नकार दिला. तुरुंगात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचे नमूद करत, आरोग्यविषयक अडचणींसाठी स्वतंत्र अर्ज दाखल करण्याचा सल्ला न्यायालयाने दिला.
“शैक्षणिक समुपदेशक नव्हे, ब्युटी पार्लर चालक”; सीबीआयचा दावा
सीबीआयने न्यायालयात दावा केला की, मनीषा वाघमारे स्वतःला शिक्षण समुपदेशक म्हणवत असल्या तरी प्रत्यक्षात त्या ब्युटी पार्लर चालवतात. तपासादरम्यान त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांचे गोपनीय प्रश्नपत्रिकेतील प्रश्न लोखंडे नावाच्या व्यक्तीला पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रश्न पुढे शुभम नावाच्या आरोपीपर्यंत पोहोचवण्यात आल्याचेही सीबीआयने सांगितले. या बदल्यात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याचा आरोप असून, काही विद्यार्थ्यांनी पैसे दिल्याची कबुली दिल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
NEET तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विद्यार्थिनीची दुर्दैवी घटना
या संपूर्ण प्रकरणादरम्यान नागपुरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. 20 मे रोजी 19 वर्षीय आकांक्षा चतुर्वेदी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. पोलिसांना मिळालेल्या पत्रामध्ये परीक्षेच्या फेरपरीक्षेचा मानसिक ताण सहन होत नसल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षा, पेपरफुटी प्रकरणे आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक तणाव यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.


