Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) 27 व्या वर्धापन दिन सोहळ्यात आज भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर आल्या असता, भाषणाच्या सुरुवातीलाच दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींनी त्या भावूक झाल्या. अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने कार्यक्रमस्थळी उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले होते. सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहताच सभागृहात ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी दणाणून गेले.
अजितदादांच्या कार्याचा स्मरण करताना भावनिक श्रद्धांजली
महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून भाषणाला सुरुवात करताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, अजितदादा आज आपल्यात नसल्याची जाणीव अजूनही स्वीकारणे कठीण वाटते. त्यांच्या अनुपस्थितीत साजरा होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन असल्याचे सांगताना त्यांनी यशवंतराव चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अजितदादांनी आयुष्यभर केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली.
‘समर्पण, संघर्ष आणि संकल्प’ या संकल्पनेतून दादांच्या कार्याचा गौरव
यंदाच्या वर्धापन दिनाची संकल्पना ‘समर्पण, संघर्ष आणि संकल्प’ अशी निश्चित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या कामकाजाच्या शैलीचे आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम, लोकहिताला दिलेले प्राधान्य आणि निर्णयक्षम नेतृत्व यांचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
“त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही”
अजित पवार यांचे पक्षातील आणि राज्याच्या राजकारणातील योगदान अधोरेखित करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, त्यांचे स्थान अद्वितीय आहे. पक्षाच्या उभारणीत आणि जनतेच्या प्रश्नांसाठी केलेल्या कामामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांची जागा दुसरे कोणीही भरून काढू शकणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याबद्दल व्यक्त केला विश्वास
भाषणाच्या शेवटी सुनेत्रा पवार यांनी पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांना तुलनेने कमी कालावधी मिळाला असला, तरी त्या काळात त्यांनी जनहिताची अनेक कामे सातत्याने केली, असे त्या म्हणाल्या. आज ते आपल्यात नसले तरी संपूर्ण राष्ट्रवादी परिवार आपल्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


